आपण करीत असलेल्या कर्मामध्येच आनंद वाटला पाहिजे. भगवतगीतेची नेमकी हीच शिकवण आहे. कर्म करीत असतांनाच जर फळाची अपेक्षा करीत राहिलो आणि आनंद, सुख आहे ते केवळ पुढे मिळणा-या फळात आहे असंच समजत राहिलो तर कर्म करण्यातला आनंद सहजच नष्ट होतो. हाती घेतलेल कर्म कसं तरी एकदा परं करावयं. संपवून टाकायचं आणि केलेल्या कर्माचं फळ केव्हा एकदा पदरात पडतं आहे म्हणून अधीर होऊन त्या फळाकडे डोळे लावून बसायचं. अशा फलाकांक्षेने केलेलं कर्म अर्थातच दु:खरुप होऊन जातं. कर्माचा सर्व आनंद गमावला जातो.
खरं म्हणजे शेतक-याला शेती करण्यातच, जमिनीची मशागत करण्यातच आनंद वाटला पाहिजे. विद्यार्थ्याला विद्यासंपादनातच समाधान मिळालं पाहिजे. परिक्षा आणि त्या परिक्षेचं फळ हे ख-या विद्यार्थ्याच्या दृष्टीने गोणच होय. केवळ परीक्षेकडे लक्ष ठेवून अभ्यास करणा-या परौक्षार्थ्यापेक्षा विद्येसाठी, ज्ञान संपादनाकरतां विद्याभ्यास करणारा विद्यार्थी हाच सर्वार्थाने विद्यार्थी होय.